मुंबई : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या आमदारांची वैयक्तिक सुनावणी पार पडली. पण संध्याकाळपर्यंत ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. उलट ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा विषय आखणी लांबणीवर गेला आहे.
विधानसभा अध्यक्षांकडं मांडली बाजू..
दोन्ही गटांच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपली बाजू मांडली. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून दोन वकिलांनी नार्वेकर यांच्यासमोर बाजू मांडली. यामध्ये अॅड. असीम सरोदे यांचा समावेश होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडली.
ठाकरेंच्या मागणीला शिंदेंचा विरोध..
यावेळी दोन्ही गटांच्या आमदरांची एकत्रित सुनावणी घेण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची मागणी मान्य करत या गटाच्या आमदारांच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळं आता आमदार अपात्रतेची सुनावणी लांबवणीवर पडली आहे.
शिंदे गटाचं म्हणणं काय?
ठाकरे गटानं सादर केलेली कागदपत्रे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळं आमची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत. गणेशोत्सव असल्यानं आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करुन उत्तर पाठवू. यावर दोन्ही गटांना याचिकार्त्यांची याचिकांची प्रत देण्यात येईल, असं सांगताना १० दिवसांत शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.






