जळगाव: महाराष्ट्र सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज जळगाव येथे पार पडला. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले. अजित पवार म्हणाले, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना तुमच्यापर्यंत आणण्याचे काम शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. शासन सर्वांच्या पाठीशी आहे. महायुतीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला चांगल मंत्रीपद दिले आहे. गिरीश महाजन यांना देखील ग्रामविकास मंत्रिपद आहे. त्यांनी याचा फायदा जळगाव जिल्ह्याला करुन द्यावा. जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा विकास झाला पाहीजे. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
प्रशासन आणि नागरिक जोडावा, म्हणून हा कार्यक्रम राज्यसरकार राबवत आहे. लोकांची कामे लवकर व्हाही यासाठी प्रशासन आापल्या दारी आले आहे. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस कमी पडला. त्या तालुक्यात पाऊस पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव येथे सभा घेत सरकारवर टीका केली होती.
अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठेही गेलो तर विकासचं बोलतो मात्र काही जण येतात. बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का. मी पण वाभाडे बाहेर काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत. यातून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचे भलं होणार नाही. यातून महाराष्ट्राचे भलं होणार नाही.”





