सावंतवाडी : एस. आर. दळवी फाऊंडेशनचे संस्थापक रामचंद्र (आबा) दळवी आणि श्रीम. सीता दळवी यांनी आपल्या फाऊंडेशनची राज्य कार्यकारिणी जाहीर केली असून अध्यक्षपदी सिंधुदुर्गचे महेश लाडू सावंत, उपाध्यक्षपदी मनोज सुतार (रायगड) आणि हनुमंत जाधव (पुणे) तर सचिवपदी इम्तियाज सिद्दीकी (रत्नागिरी) तसेच सहसचिवपदी श्रीम. वरुनाक्षी आंद्रे (पालघर) यांची निवड करण्यात आली आहे.

स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन हे मूळ उद्देश समोर ठेऊन दोन वर्षांपूर्वी या एनजीओ फाऊंडेशनची स्थापना त्यांनी मुंबई येथे केली होती. त्यांनी नवीन राज्य कार्यकारिणीतील सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून उद्देशपूर्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.
फाऊंडेशनच्या माध्यमातून डिजिटल युगात शिक्षक सक्षम होण्यासाठी विविध प्रशिक्षणे तसेच शिक्षक पुरस्कार यांचे आयोजन केले जाते. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या सर्वात सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नवनियुकत राज्याध्यक्ष महेश सावंत यांनी सदर फाऊंडेशन हे सर्व स्तरातील शिक्षकांसाठी असून कोणीही शिक्षक या फाउंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, असे सांगितले. भविष्यात विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच पर्यावरण पूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.





