मुंबई – मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या जागी समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांना संधी देण्यात येणार का? त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांच्या गैरहजेरीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये नाराजी दिसून आली होती. शिवाय चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष करा अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासाठी सकारात्मक नसल्याचा आरोप केला होती. तसेच समितीचे अध्यक्ष पाटील नव्हे तर अजित पवार यांना करा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता काही क्षण ते स्तब्ध झाले. शिंदे पुढं म्हणाले की, अजितदादांना अध्यक्ष करण्याची मागणी झाली आहे. अजितदादांकडे पाहात, शिंदे म्हणाले, त्यावर विचार करून निर्णय घेऊ.





