सिंधुदुर्गनगरी : आपल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोघा पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, या मागणी करिता न्हावेली येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी आज सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गसमोर उपोषण सुरू केले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने खाकी वर्दीचा अनाधिकारे वापर करून आपली मॅक्झिमो प्लस चार चाकी गाडी बेकायदेशीररित्या जप्त केली. त्यामुळे आपले १९ महिन्याचे सुमारे ९ लाख आणि मेंटेनन्सचे मिळून १३ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून चारचाकी गाडी बेकायदेशीररित्या नेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवली आहे, असा गंभीर आरोप पार्सेकर यांनी निवेदनातून करुन तत्कालीन पोलीस अधिकारी डुमिंग डिसोजा यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करून त्यांना व सातार्डा बीटचे पोलीस हवालदार गुरुनाथ नाईक यांना सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय खातेनिहाय चौकशी करावी, अन्यथा ११ सप्टेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सुंदर पार्सेकर यांनी निवेदन देऊन केला होता. मात्र निवेदन देऊन त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुंदर पार्सेकर यांनी आज सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपले उपोषण सुरू केले आहे.





