कणकवली : 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून साजरे केले जात आहे . याला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला सध्या सुरू असलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात वाण म्हणून विविध तृणधान्य माहितीपत्रकासह वाटत आहेत. याद्वारे तृणधान्यांचे आहारातील पौष्टिक महत्त्व इतर महिलांपर्यंत पोहोचवत आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने संयुक्त राष्ट्र संघटनेने यंदाचे वर्ष हे “इंटरनॅशनल मिलेट इयर” म्हणजेच “जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून जाहीर केले आहे. तृणधान्याला भरडधान्य असेही म्हणतात . यानिमित्ताने शासकीय पातळीवर अनेक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहसिंधू कृषी पदवीधरांची संघटनेने देखील यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. यातील एक कार्यक्रम म्हणजे सध्या सुरू असलेल्या हळदीकुंकू समारंभात महिलांना वाण म्हणून तृणधान्य संपूर्ण माहितीसह देण्याचे आवाहन करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने “सिंधुदुर्ग भरडधान्य मिशन” हाती घेतले आहे. याला उत्तम प्रतिसाद देखील महिलांकडून मिळत आहे .
विविध आजारांना निमंत्रण देणारे ग्लुटेन हे गहू किंवा तांदळामध्ये असतेच . मात्र भरडधान्यांमध्ये ग्लुटेन अजिबात नसते . त्यामुळे भरडधान्य वापरल्याने ग्लुटेन मुळे होणारे विकार आपण दूर ठेवू शकतो. हळदीकुंकूच्या ठिकाणी तृणधान्य विषयी माहिती देणारे प्रदर्शन देखील मांडण्यात येते. लोप पावत असलेली ज्वारी , बाजरी , नाचणी ,वरी , इत्यादी सारख्या पौष्टिक तृणधान्यांबरोबरच याबद्दलचे माहितीपत्र वाण म्हणून या महिला देत आहेत .
अधिकाधिक शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकवावे तसेच त्यांचा आहारात उपयोग सर्वांनी करावा, शाळांमधील पौष्टिक आहारात तृणधान्य वापरावेत यासाठी देखील या तृणधान्य वर्षात प्रयत्न केले जाणार आहेत .





