जालना : गेल्या १०-१२ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांना काही वेळा उपचारही घ्यावे लागले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं दिसत असताना दुसरीकडे शासन स्तरावर चर्चा चालू आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालं होतं. हे शिष्टमंडळ आता परत जात असून त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी बंद लिफाफ्यामध्ये काही निर्णय पाठवले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून त्यातून मराठा आरक्षणासंदर्भातील तिढा मिटवण्यासाठी सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला. मात्र, वंशावळ शब्द काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्याचसंदर्भात हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालं होतं.
बंद लिफाफ्यात नेमकं काय?
दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एक बंद लिफाफा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अर्जुन खोतकर यांच्याकडे दिला आहे. या लिफाफ्यात नेमकं काय आहे? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. अर्जुन खोतकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “आमची चर्चा झाली. या लिफाफ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्णय दिले आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवले जातील. त्यानंतर पुढचा निर्णय होईल”, असं ते म्हणाले.





