सावंतवाडी : आपल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोघा पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी न्हावेली येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई न केल्यास ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा पार्सेकर यांनी दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने खाकी वर्दीचा अनधिकृत वापर करून आपली मॅक्झिमो प्लस चारचाकी गाडी बेकायदेशीररित्या जप्त केली. त्यामुळे आपले १९ महिन्याचे सुमारे ९ लाख आणि मेंटेनन्सचे मिळून १३ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून चारचाकी गाडी बेकायदेशीररित्या नेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवली आहे, असा गंभीर आरोप पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. तत्कालीन पोलीस अधिकारी डुमिंग डिसोजा यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करून त्यांना व सातार्डा बीटचे पोलीस हवालदार गुरुनाथ नाईक यांना सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय खातेनिहाय चौकशी करावी. अन्यथा ११ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सुंदर पार्सेकर यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.





