रत्नागिरी : किरण सामंत लोकसभेला इच्छुक असतील तर आपण स्यांना साडेतीन लाख मताधिक्क्यांनी विजयी करू, असे वक्तव्य उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नुकतेच चिपळुणात केले होते. या पार्श्वभूमीवर सावर्डे येथील सचिन पाकळे, विजय गुजर आणि केतन पवार यांनी आपण किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार व लवकरच याबाबत शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
सावर्डे येथे ही पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना सचिन पाकळे म्हणाले, लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एक चांगला क्रियाशिल आणि लोकाभिमुख खासदार या पुढच्या काळात हवा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा खासदार लाभल्यास या भागाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने आमच्या डोळ्यासमोर किरण सामंत हे नाव आहे. त्यांनी लोकसभेची उमेदवारी घ्यावी यासाठी आपण मनधरणी करीत आहोत आणि महायुतीने त्यांना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून लवण्यासाठी उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण लवकरच भेट घेणार आहात, असे सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू व अनेक हितचिंतक व मित्रपरिवाराकडून किरण सामंत यानी निवडणूक लढवावी यासाठी आग्रही मागणी होत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील लोकांना एकत्र करून सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत व लवकरच वरिष्ठ नेत्यांची या बाबत भेट घेण्यात येईल, असे पाकळे म्हणाले, माजी सभापती विजय गुजर म्हणाले, किरण सामंत हे तळागाळापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्त्व आहे. दोन्ही जिल्ह्यांना असा खासदार लाभल्यास विकासाला चालना मिळेल. रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमारांना व्हॅन, ई बाईक व अन्य अत्याधुनिक साहित्य दिले आहे. परशुराम देवस्थान, मार्लेश्वर देवस्थानला निधी प्रस्तावित आहे. रत्नागिरीमध्ये मोठे प्राणी संग्रहालय होत आहे. त्यामुळे विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे, असे सांगितले, विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
केतन पवार म्हणाले, किरण सामत यांच्याकडे जात-पात, पक्षभेद नाही. आलेल्या माणसाचे काम करणे एवढेच ते जाणतात आणि एखाद्याचे काम होईल की नाही ते त्याचवेळी सांगतात. या शिवाय त्यांच्याबरोबर प्रशासन कायम असते. त्यामुळे प्रशासनाला बरोबर घेऊन ते जनतेची कामे करतात. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. युवक, क्रीडास शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांच्या हाताला रोजगार आणि विकासाला चालना द्यायची असेल तर किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. विकास निधी ते निश्चितपणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त आणू शकतात आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा विकास होऊ शकतो.





