रोहा : आरोग्यदायी नैसर्गिक रानभाजी सर्वांनाच भुरळ घालतात. आजकाल आरोग्याच्या दृष्टीने रानभाजींना पसंती देण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याच रानभाजींचे महत्त्व जाणत असंख्य दुर्गम भागातील लोक मुख्यत: आदिवासी बांधव शहर ठिकाणी रानभाजी आणत आहेत. याच रान भाजीची ओळख व्हावी, तिचे महत्व अधिकच कळावे यासाठी शनिवारी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव, प्रदर्शनाचे तालुका कृषी अधिकारी रोहा, प्रकल्प संचालक आत्मा रायगड, श्री विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
रोहा शहरातील भाटे वाचनालय येथे शनिवारी २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन ना आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी खा सुनिल तटकरे, आ अनिकेत तटकरे, आ रवीशेठ पाटील, आ महेंद्र दळवी, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले, कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली. तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव प्रदर्शनात अनेक रानभाजी पाहायला मिळतील, रानभाजी पाहण्याची अनोखी मेजवानी तालुका, जिल्हास्तरीय शेतकरी, विविध क्षेत्रातील नागरिक विशेषत: महिलांना मिळणार आहे. रानभाजी महोत्सवातील रानभाजीचे प्रदर्शन सर्वांनाच भुरळ घालणार आहे. विविध नावांनी ओळखली जाणारी रानभाजी, त्या रानभाजीची खासियत, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अनुभवता येणार आहे. मूळात रानभाजी ही नैसर्गिक असल्याने आरोग्यासाठी खूपच लाभदायी आहे. आज याच रानभाजीचे महत्व प्रचंड वाढले आहे. गुळवेल, घोळभाजी, करटोली, कुरडू, अळूचे पान, आंबडा, खापरखुटी, गोखरू, कुड्याचे फुल, टाकळा, भारंगा, शेपू, शेवळा, बाबूंचे कोम व अन्य भाजी ऐन पावसाळ्यात मेजवानी ठरते. या सर्व रानभाजी मूळत: नैसर्गिक असल्याने आरोग्यदायी असतात, याच रानभाजीचा प्रचार प्रसार होण्यासाठी, भाजीची ओळख होण्यासाठी नागरिकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने रानभाजी महोत्सवाला भेट द्या असे आवाहन कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे. दरम्यान, रानभाजी महोत्सवाचे महत्व ओळखून जोरदार तयारी कृषी विभाग रोहा व अन्य सहभागी संस्था करीत आहे, हे रानभाजी महोत्सव देखणे होईल असा विश्वास कृषी विभाग व विविध सहभागी संस्थांनी व्यक्त केला आहे.





