सिंधुदुर्गनगरी : कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प संचालिका
भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. मंगळवार दिनांक 29/8/2023 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकरी, प्रक्रियादार व नव उद्योजक यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्रीम. नाईकनवरे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे व पायाभूत सोई सुविधा निर्माण करण्यासाठी विविध योजना आहेत त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेउन आपला उत्पादित शेतमाल प्रक्रिया पॅकिंग व साठवणूक करुन बाजारात मागणीप्रमाणे विकता येईल, असेही त्यांनी उपस्थित शेतकरी प्रक्रिया उद्योजक यांना मार्गदर्शन केले.
कृषी पायाभूत सुविधेसाठी योजनेबद्दल सविस्तर सादरीकरण स्मार्टचे सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी श्री. कुरकुटे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व व्हिडिओच्या माध्यमातून केले. नाबार्डच श्री. थुटे यांनी बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे सांगितले. तसेच बँक प्रतिनिधी यांनी बँक प्रणाली बाबत विस्तृत माहिती दिली.
तसेच उपस्थित शेतकरी यांची कर्ज आणि पायाभूत सुविधा कर्ज प्रक्रिया बाबत शंकाचे निराकरण केले. तसेच तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी गोरख गोरे यांनी कृषी विभाग या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वोतपारी मदत करेल अशी ग्वाही दिली . सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक सावंतवाडी शाखेचे व्यवस्थापक श्री. शिंदे यांनी कृषी पायाभूत सुविधेबाबत बाबत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली व प्रस्ताव करणे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनविणे करिता सर्वोतपारी मदत करू असे सांगितले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक अजमुद्दीन सरगुरु यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती मिनल परब व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी श्री यशवंत गव्हाणे यांनी केले.
सदर कार्यशाळेस आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प संचालिका श्रीमती नाईक नवरे, नोडल अधिकारी स्मार्ट सिंधुदुर्ग श्री कुरकुटे, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, बँक ऑफ इंडियाचे श्री. कुंभारे, नाबार्डचे श्री. थुटे , सिंधुदुर्ग बँक मॅनेजर श्री. शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री. गोरे आणि शेतकरी उद्योजक तसेच माविम व उमेद अंतर्गत महिला बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





