रायगड : कोकण किनारपट्टीवर चरसची पाकिटे सापडण्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आलं आहे. मंगळवारी दिवेआगर, भरडखोल किनारी तब्बल 21 पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी रायगड, श्रीवर्धन किनाऱ्यांवरुन तीन दिवसात चरसची 82 पाकिटे जप्त केली आहेत. जप्त मालाची किंमत चार कोटींच्या वर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रायगड पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर शोध मोहीम सुरू आहे.
कोकण किनारपटटीवर चरसची पाकिटे सापडण्याचे प्रकरण सुरु असताना श्रीवर्धन तालुक्यातील वेगवेगळया किनाऱ्यांवर आतापर्यंत 107 पाकिटे सापडली आहेत. पाकिटांचे वजन आणि पंचनाम्याचे काम अद्यापही सुरू आहेत. सापडलेल्या मालाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रूपये असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलिसांकडून श्रीवर्धनच्या किनारपटटीवर अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवर आणखी पाकिटे सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशी पाकिटे आढळल्यास पोलीसांना माहिती द्यावी, पाकिटे लपवून ठेवणाऱ्यां विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
कुठे किती पाकीटे सापडली ?
जीवना बंदर – 9 पाकिटे, मारळ बीच – 30 पाकिटे, सर्वे बीच- 24 पाकिटे, कोंडीवली बीच- 11 पाकिटे, दिवेआगर बीच- 33 पाकिटे
एकूण – 107 पाकिटे
आतापर्यंत कुठे सापडली चरसची पाकिटे ?
27 ऑगस्ट – श्रीवर्धन जीवना बंदर 9 बॅग – 10 किलो 300
28 ऑगस्ट – हरीहरेश्वर, मारळ किनारा 30 बॅग 35 किलो
28 ऑगस्ट रात्री – सर्वे किनारा 24 बॅग, 24 किलो 551 ग्राम
एकूण बॅग – 61
एकूण किंमत अंदाजे 3 कोटी रुपये





