धुळ्याच्या पोराचा नाद खुळा.!, बनवली जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक.! ; वडील रिक्षाचालक, आई शेतमजूर.!

238

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील गोराणे या एका छोट्याशा खेडेगावातील रिक्षा चालकाच्या मुलाने आपली कल्पकता वापरून विविध प्रकारचे आकर्षक फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. भूषण कदम असे या तरुणाचं नाव असून मुंबई विद्यापीठातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने भारतातच राहून देशासाठी काहीतरी इनोव्हेशन करायचे ठरवले असून सध्या त्याची ही गाडी गावात आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची बसणारी टंचाई या बाबी डोळ्यांसमोर ठेवून विविध कंपन्यांनी विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक बनवण्यावर सध्या भर दिला आहे. विशेष म्हणजे जनतेचाही या गाड्यांना प्रतिसाद मिळू लागला असून मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ वाढली आहे. या गाड्यांचा प्रयोग देशात यशस्वी झाला असला तरी त्या गाड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या इतर काही समस्यांमुळे या इलेक्ट्रिक बाईकचे मार्केट अद्यापही मर्यादित स्वरूपातच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत यात काही बदल करून सर्वसामान्यांना अधिक फायदेशीर ठरणारी इलेक्ट्रिक बाईक बनवता येईल का? या विचारातून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील रहिवासी असणाऱ्या भूषण कदम याने त्याच्या कॉलेजच्या अखेरच्या वर्षातील प्रोजेक्ट रिसर्चसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल हा विषय निवडला होता.

इलेक्ट्रिक व्हेहिकल रिसर्च करत असताना त्याच्या लक्षात असे आले की इलेक्ट्रिक गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरी हिटिंग मोठ्या प्रमाणावर तयार होत असते. ही हीटिंग कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशेष व्यवस्था नसल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढून गाड्या पेट घेतात. तसेच इलेक्ट्रिक गाडीतील सर्व कंपोनंटपैकी सर्वात महाग असणाऱ्या बॅटरीची क्षमता आणि आयुष्य देखील कमी होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी भूषणने स्वतःची हिट मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली. यामुळे गाडीच्या बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहून ती चालकासाठी आणखी सुरक्षित बनली आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकचे बॅटरीचे आयुष्य दोन ते तीन वर्ष मानले जाते.