हिंगोली : उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी हिंगोलीतील कळमनुरी येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या यात्रेला कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी बांगर यांनी हातात तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केल्या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कळमनुरी शहरामध्ये निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्ताने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करत त्यांना तलवार दिली होती. ही तलवार संतोष बांगर यांनी म्यानातून काढून समुदायाला दाखवत शक्तीप्रदर्शन केलं होतं.
याप्रकरणी कळमनुरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावला असेही पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.





