सातारा : राज्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यात सत्ता आणणे अशक्य असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपात दोन लोकसभा आणि आठ ते दहा विधानसभेच्या जागा पक्षाला मिळण्यासाठी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरपीआय (RPI) आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी येथे आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, ‘‘गेल्या वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर आमचे पाच उमेदवार उभे होते. त्यापैकी दोन उमेदवार निवडून आले; परंतु आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर उभे राहणे अशक्य आहे. मी तीन वेळा जेव्हा काँग्रेसच्या आघाडीबरोबर निवडून आलो, तेव्हा आरपीआयच्या चिन्हावर निवडून आलो.
आगामी निवडणुकांमध्ये आरपीआयचे पाच ते सहा आमदार निवडून येतील, अशी आमची बांधणी सुरू आहे. सर्व घटक पक्षांशी एकत्र बसून आम्ही चर्चा करणार आहे. राज्यात माझा गट प्रभावी असल्याने महायुतीने आरपीआयला डावलून चालणार नाही. २००९ मध्ये माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतर शिर्डी मतदारसंघातील अनेक नेते मंडळी भाजपमध्ये आल्याने मी पुन्हा शिर्डीमधून इच्छुक आहे.’’
आमच्या मनात रामदास आठवले…
खासदार उदयनराजे भोसले हे आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना उदयनराजे यांनी ‘आमच्या मनात रामदास आठवले, म्हणून आम्ही त्यांना गटविले,’ अशी कविता करताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.





