बारामती : तब्बल दोन महिन्यानंतर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. शहराच्या वेशीवर छत्रपती शिवाजी उद्यानापासून अजित पवार यांची उघड्या जीपमधून राष्ट्रवादीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच बारामती भेट असल्याने आज कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांनी त्यांचे हार, बुके देत व फुलांची उधळण करत स्वागत केले.
ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांना हार घालून स्वागत केले. आज जेसीबी मशीनच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ व संजीवनी ग्रुपने त्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे हार घालण्याची व्यवस्था केली होती.
अजित पवार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बँड, ढोलपथकाच्या साथीने त्यांची मिरवणूक काढली गेली. संतोष गालिंदे व सहका-यांनी मशीनच्या सहाय्याने अजित पवार यांच्यावर दोन टनांहून अधिक फुलांची उधळण केली. मिरवणूकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व फ्लेक्स लावून व्यापारी वर्गाने पवार यांचे स्वागत केले.
तालुक्याच्या विविध भागातून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगणात दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह अनेक सहका-यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.
नागरिकात कमालीचा उत्साह…
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीत आलेले होते, त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे बारामतीकरांनी केलेल्या भव्य स्वागताची राजकीय वर्तुळात चर्चा होती. नागरिकांनी उत्साहाने त्यांचे स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शविला.
बारामतीकरांनी केली तुफान गर्दी…
अजित पवार यांचा बारामती शहरात प्रवेश करताच कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी उद्यानापासून लोकांनी तुफान गर्दी केली होती. अजित पवार हे लोकांचे अभिवादन स्वीकारत शारदा प्रांगणापर्यंत येईपर्यंत मोठा कालावधी गेला. या मिरवणुकी दरम्यान अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही लोकांच्या स्वागताचा स्वीकार केला.





