सच्चिदानंद राऊळ यांचा सत्यवान रेडकरांनी केला सत्कार ! ; भारतीय टपाल विभागात स्तुत्य निवड.

75

सावंतवाडी : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ असून विविध शैक्षणिक संकुलात, विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत व पारदर्शक प्रशासनाचा भाग बनावे, यासाठी विविध माध्यमातून निःशुल्क मार्गदर्शन प्रदान केले जाते.

‘तिमिरातुनी तेजाकडे’ या समुहातील विद्यार्थी सच्चिदानंद कृष्णा राऊळ, (मुक्काम पोस्ट – आंजिवडे – भाकरवाडी, ता. कुडाळ.) यांची वर्ष २०२१ मध्ये झालेल्या भारतीय टपाल विभागाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग या विभागासाठी पोस्टमन पदावर निवड झाली. जिद्द व चिकाटी बाळगून त्यांनी टपाल विभागाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्याबद्दल व्याख्याते,व मुंबई सीमाशुल्क विभागात सेवेत असणारे अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत शाल व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन यशवंत रेडकर, मंदार मालंडकर, ध्रुव गुप्ता उपस्थित होते.

राऊळ हे अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेले असून स्वयंअध्ययनाने त्यांनी हे यश संपादन केले. हे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांबाबत उदासीनता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन सत्यवान रेडकर यांनी केले.