‘साहेबां’चा माणूस अजितदादांनी फोडला ; बीडमध्ये भाऊ भावाला भिडणार!

55

मुंबईः जसं बारामतीत पवार घराणं, तसंच बीडमधलं क्षीरसागर घराणं आहे. बीडमधलं मुंडे घराणं ही प्रसिद्ध आणि सध्या राजकारणात सक्रीय आहे. पण मुंडेंपेक्षाही राजकारणाचा जुना इतिहास हा क्षीरसागर घराण्याला आहे. कारण, दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर या बीडमधील पहिल्या महिला खासदार होत्या. ज्यावेळी राजकारणात महिलांचा सहभाग म्हणावा इतका नव्हता. अशावेळी काँग्रेसकडून केशरकाकू या आमदार, खासदार झाल्या होत्या. त्यामुळे आता त्यांचेच दोन नातू राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं दिसतंय. कारण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर याचे पुतणे डॉ. संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत आहेत तर दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी कालच अजित पवार गटात प्रवेश केला.

कोण आहेत डॉ. योगेश क्षीरसागर?

डॉ. दीपा आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे ते चिरंजीव आहेत. माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचे नातू. तर माजी मंत्री डॉ. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे अन् आमदार डॉ. संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू. डॉ. योगेश यांचा जन्म १ नोव्हेंबर १९८२ रोजी झाला. बीडमधील एकमेव न्यू ऑपोस्टॅलिक इंग्लिश शाळेतून त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. तर विज्ञान शाखेतून माध्यमिक शिक्षण.

आजी तथा माजी खासदार केशरकाकूंच्या इच्छेनं योगेश यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. २०१४ साली बीडमध्ये सौ. के.एस.के हॉस्पिटलची स्थापना केली. २०१६ साली त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. २०१७ साली बीड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. २०१९ मध्ये माजी मंत्री आणि काका जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचाराची धुरा योगेश यांनी सांभाळली. त्यामुळे बीड शहर आणि मतदारसंघातील तरुणांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

डॉ. योगेश क्षीरसागर हे काकू-नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. संयमी, शांत, अभ्यासू, उच्च शिक्षित नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासारखं उच्च शिक्षित नेतृत्व आणि पवारांच्या जवळच्या असणाऱ्या क्षीरसागर घराण्यातला हा पठ्ठ्या धनंजय मुंडेंच्या साथीनं अजित पवारांनी फोडल्याचं बोललं जातंय. यावेळी योगेश क्षीरसागर यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक नगरसेवकांनीही अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं कळतंय.

त्यामुळे १७ तारखेला पवारांची जी सभा झाली, ती संदीप क्षीरसागर यांनी चांगलीच गाजवली. त्यात पवारांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून बीडमध्ये पवारांच्या गटाची ताकद वाढल्याची चर्चा असतानाच अजित पवार गटानंही खेळी खेळली. बीडमधल्या क्षीरसागर घराण्यातल्या दुसऱ्या पुतण्याला आणि डॉ. संदीप क्षीरसागर यांचे बंधू डॉ. योगेश क्षीरसागर यांना जवळ केलं.विशेष म्हणजे काका आणि माजी मंत्री डॉ. जयदत्त क्षीरसागर हे स्वत: पक्षाविना आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुतणे योगेश यांना थोडं थांबा आणि वाट पाहा, असा सल्ला दिला होता. पण त्याला न जुमानता डॉ. योगेश क्षीरसागर आणि त्यांची पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे आता बीडमध्ये कोणत्या पवारांची ताकद नेमकी वाढणार, हे तर येत्या निवडणुकांमधूनच कळेल.