पावसाने दडी मारल्याने पिकांना बसतोय फटका ; सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी चिंतेत !

31

बांदा : सावंतवाडी तालुक्यात गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने याचा फटका भात शेतीबरोबर नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांना बसला आहे. पावसाने गेले पंधरा दिवस पाठ फिरवल्याने नाचणी, भुईमूग सारखी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकरी इंजनाच्या सहाय्याने पाणी उपसा करत आहे. परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा पर्याय नाही तेथील पिकांचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.


जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी व भात पिकांची लावणी झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस बरसला. मडुरा दशक्रोशीत नाचणी व भुईमूग पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकरी जोडपीक म्हणून नाचणीची लागवड करतात. परिसरात काही ठिकाणी पाऊस कोसळतो तर काही ठिकाणी दोन दिवस आड पाऊस पडतो. सद्यस्थितीत मडुरा पंचक्रोशीत भरडी जमिनीवर लावलेली नाचणी व भुईमू पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. तर काही ठिकाणी नाचणी पीक लावण्यायोग्य न आल्याने उत्पन्नाच्या वेळेवर पाऊस नसणार अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे पाऊस वेळीच पडला नाही तर केलेली नाचणी भुईमुक्त इतर पिके धोक्यात येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
एकंदरीत कायम निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकणारा बळीराजावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.