धक्कादायक… घरगुती वादातून धाकट्या भावाने केली मोठ्या भावाची हत्या!

81

यवतमाळ : घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झटाळा गावात गुरुवारी (17 ऑगस्ट) सकाळी हत्येची घटना घडली. शालीक खेत्रू मसराम (वय 50 वर्षे) असं मृताचं नाव आहे. तर मारोती खेत्रु मसराम (वय 42 वर्षे) असं आरोपी लहान भावाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन वाद

मृत शालिक मसराम व मारोती मसराम या दोघांचा वाद सुरु झाला. आरोपीची पत्नी माहेरी गेली होती. ती नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. “तुझ्यामुळे माझी पत्नी घर सोडून गेली, माझा परिवार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तूच कारणीभूत आहेस,” असं म्हणत दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी मारोतीने शालीकच्या डोक्यात दगडाने वार केला यात तो जागीच कोसळला. तर मारोती घराबाहेर निघून गेला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांनी जखमी शालीकला उपचारांसाठी घाटंजी रुग्णालयात नेतं. परंतु तिथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणी मृत शालीक मसरामच्या पत्नीने पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवला. तर मारेकरी मारोती मसरामविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. घाटंजी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.