मुंबई : ‘‘ह्युंदाई कंपनीचा चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात येणार असून पहिला प्रकल्प पुण्यात उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीही राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘दक्षिण कोरियामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूह पुण्यात ४७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या ‘हॅवमोअर ब्रँड’चे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. द. कोरियाच्या दौऱ्यातील बैठकीत यावर संबंधितांशी नुकतीच चर्चा झाली. जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.’’
‘‘पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनिअम झाकणाचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी पाच एकर जागेची मागणी कंपनीने केली आहे. या प्रकल्पासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे या प्रकल्पास चालना मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या एल.जी कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे.
त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस आल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जे उत्पादन कोरियात होते, तसे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे,’’ असे सामंत यांनी सांगितले.
राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार
राज्यात या वर्षीपासून उद्योगरत्न, उद्योगमित्र, मराठी उद्योजक आणि महिला उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पहिला सोहळा येत्या २० रोजी ‘बीकेसी’तील (मुंबई) जिओ सेंटर येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.
उद्योगमित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील ‘सह्याद्री समूहा’चे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा ‘किर्लोस्कर समूहा’च्या गौरीताई किर्लोस्कर यांना या वेळी प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.





