‘त्या’ फाईव्ह स्टार हॉटेलचा प्रश्न दोन महिन्यात निकाली ..! – मंत्री दीपक केसरकर

44

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-मोचेमाड येथे होणाऱ्या पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सुटेल. पाण्याची समस्या दूर करून तात्काळ हे हॉटेल सुरू करण्यात येईल, अशी माहिती आज येथे आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान पारगड, हनुमंतगड ते दोडामार्ग हा भाग थेट गोव्याला सर्किट रस्त्याने जोडला जाणार आहे. तर संकेश्वर-रेडी या महामार्गाचे आजऱ्यापर्यंत काम सुरू असून आता पुढील महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्षा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोचेमाड या भागात जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोट्यावधी खर्च करून उभा करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे ती दूर झाल्यास येत्या दोन महिन्यात हे हॉटेल सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वेळागर येथे होणाऱ्या हॉटेलचा प्रश्न सुटल्यात जमा आहे. गेले दोन महिने हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. तेथील जमीन मालकांना वाढीव नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर खटले मागे घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तोही प्रश्न निश्चितच सुटेल, असा विश्वास त्यांनी या व्यक्त केला.