मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे दोन सिमकार्ड असतात. या दोन्ही नंबरचे व्हॉट्सअॅप अकाऊंट्स वापरण्यासाठी मात्र यूजर्सना दोन वेगवेगळ्या अॅप्सची गरज भासते. यासाठी मग क्लोन अॅप, किंवा बिझनेस व्हॉट्सअॅप वापरणं; किंवा मग सरळ दुसरा फोन जवळ बाळगणं हाच पर्याय असतो. मात्र, आता यूजर्सना एकाच व्हॉट्सअॅप अॅपमध्ये अनेक अकाउंट्स वापरता येणार आहेत. त्याच अॅपमध्ये यूजर्स दुसऱ्या नंबरवर स्विच करू शकतील. अँड्रॉईडच्या व्हॉट्सअॅप बीटा 2.23.17.8 या अपडेटमध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे. WABetaInfo या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाईट व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या नवीन फीचर्सवर लक्ष ठेऊन त्याबाबत माहिती देते. एकाच अॅपमध्ये अनेक अकाउंट वापरता येण्यासाठी व्हॉट्सअॅपने मल्टी अकाउंट स्विच हे फीचर तयार केले आहे.
कसं वापरता येईल?
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या असलेल्या क्यूआर कोड बटणाच्या शेजारी एक नवीन आयकॉन यासाठी देण्यात येणार आहे. या आयकॉनवर क्लिक करुन तुम्ही नवीन अकाउंट अॅड करू शकाल. तुम्ही लॉगआऊट करत नाही, तोपर्यंत त्या डिव्हाईसमध्ये दोन्ही अकाउंट अॅक्टिव्ह राहतील. या फीचरमुळे यूजर्सना पर्सनल चॅट्स, कामाचे चॅट्स आणि इतर गोष्टी एकाच अॅपमध्ये वेगवेगळ्या ठेवता येतील. या विविध अकाउंट्सचे नोटिफिकेशनही वेगवेगळे येतील. सध्या काही बीटा यूजर्सकडे हे फीचर दिलं असून, लवकरच सर्व यूजर्ससाठी ते उपलब्ध करून देण्यात येईल.





