पोलिस लोगो आणि पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करा…!

सिंधुदुर्गनगरी : पोलीस लोगो किंवा पाट्या वापरून गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई करा. त्या गाड्यातून अवैध वाहतूक होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा गाड्यांची आणि गाडीत असलेल्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल याच्याकडे दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यतः मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळे यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला, जलक्रीडा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यात सर्वसामान्य नागरिकांसह देशी विदेशी नागरिक, अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असतो. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक गाड्यांवर पोलिस विभागाचा लोगो किंवा पोलिस अशी पाटी लावलेली आढळून येते.

मात्र अशा  पाट्या कशासाठी लावल्या जातात याचा पोलिस विभागाने शोध घ्यावा. या पाट्या दहशत निर्माण करण्यासाठी की नागरिकांना घाबरविण्यासाठी लावल्या जातात? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अशा पाट्या लावून या गाड्यांमधून अवैध धंदे तर नाही ना चालत अशी ही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे चिन्ह अथवा पोलिस अशी पाटी लावलेल्या वाहनावर राज्यपालांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.