३९ चेंडूत १७८ धावा! ; पृथ्वी शॉचा द्विशतकी धमाका..!

138

नार्थएंपटन : भारताचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावत आहे. भारतीय संघातून वगळला गेलेला पृथ्वी शॉ संघात परतण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे आणि सततच्या वादामुळे त्याला आपले संघातील स्थान गमवावे लागले.

भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता पृथ्वी शॉ काऊन्टीचा देखील हंगाम गाजवत आहे. नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आज सोमरसेटविरूद्धच्या सामन्यात 153 चेंडूत 244 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 129 चेंडूत द्विशतक ठोकत आपण अजूनही मोठा धमाका करण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिले. पृथ्वी शॉने 153 चेंडूत केलेल्या 244 धावांच्या जोरावर नॉर्थम्पटनशायरने 50 षटकात 8 बाद 415 धावांचा डोंगर उभा केला. पृथ्वीने आपल्या खेळीत 28 चौकार आणि 11 षटकार मारले. त्याने 39 चेंडूतच 178 धावा कुटल्या. नॉर्थम्पटनशायरकडून व्हाईटमॅनने 54 तर रिकार्डोने 47 धावांची खेळी केली.

पृथ्वी शॉ क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कठिण काळाबद्दल बोलला होता. तो म्हणाला की, प्रत्येकजण एकमेकांशी बोलतं. मात्र कोणी मन मोकळं करत नाही. मी तरी कोणासोबत मन मोकळं करत नाही. दंगा मस्ती सुरू असते मात्र वैयक्तिक स्पेस ही वैयक्तिकच असते.’

ज्यावेळी पृथ्वीला तो त्याचं मन कोणासमोर मोकळं करतो असे विचारल्यावर त्याने त्याच्या वडिलांच आणि कोचचं नाव घेतलं होतं. तो म्हणाला होता की, ‘मी माझ्या वडिलांशी बोलत असतो. जर क्रिकेटबाबत काही असेल तरी मी माझे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांच्याशी चर्चा करतो. मी फक्त तुम्हालाच सांगत आहे की मी आता माझे विचार लोकांशी शेअर करणं बंद केलं आहे. मी ते सर्व माझ्याजवळच ठेवतो.’