उद्या क्रांती दिनानिमित्त शहीद जयराम देसाई यांना कोमसाप देणार मानवंदना…!

76

सावंतवाडी : इंग्रजांच्या विरोधात देशात पहिल्यांदा १८५७ पूर्वी बंड पुकारणाऱ्या डेगवे येथील क्रांतिकारक शहीद जयराम देसाई यांना कोमसापच्या वतीने उद्या ता. ९ ला सकाळी ११ वाजता मानवंदना देण्यात येणार आहे.कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तर्फे क्रांती दिना दिवशी डेगवे येथील क्रांतिकारक जयराम देसाई यांना मानवंदना देण्यात येणार आहे. डेगवे येथे ज्या ठिकाणी देसाई यांना इंग्रजांनी फाशी दिली, त्या ठिकाणी जाऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य मानवंदना देणार आहेत. यावेळी बांदा येथील स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग व गोगटे महाविद्यालय पानवळचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. १८५७ पूर्वी देसाई यांनी डेगवे येथे इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून क्रांतीची सुरुवात केली होती.
या ऐतिहासिक घटनेला मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व गोगटे महाविद्यालय पानवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पानवळ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी कोकण मराठी परिषदेतर्फे स्वातंत्र्य सैनिक  एस. आर. सावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मराठी परिषदचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व प्राचार्य काजरेकर डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.