बापरे.. ७ महिन्यात २०० अपघात ; ‘हा’ हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा..!

46

मुंबई:  मुंबई – अहमदाबाद महामार्गावर अपघाताची संख्या वाढत आहे. हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२३ या सात महिन्याच्या कालावधीत महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत  २०० अपघात झाले. यामध्ये ९५ जणांचा मृत्यू तर १८ ८ जण जखमी झाले आहेत. अच्छाड ते मुंबई सीमेवर अपघात वाढले आहेत. महामार्गावरील खड्डे चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहने भरधाव वेगाने चालवणे अशा अनेक कारणांमुळे महामार्गावरील अपघातात वाढ झाली आहे.  एबीपी माझाने पोलीस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे टायर फुटतात आणि अपघात होतात. या महामार्गावर प्रशासनाने लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

देशात दरवर्षी ५ लाख अपघात-

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अपघातांची आकडेवारी सांगितली होती. दिल्लीतील रस्ता सुरक्षा जागरुकता मोहिमेत नितीन गडकरी बोलत होते. त्यांनी देशातील रस्ते अपघाताबद्दल खंत व्यक्त केली.

देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात, आणि १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, असे गडकरी यांनी सांगितले होते.

“अपघातामध्ये ६० टक्के प्रकरणांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील लोकांना आपला जीव गमवावा लागतो, ज्यामुळे आपल्या जीडीपीचे ३.१४ टक्के नुकसान होते आणि ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे,” अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती.