भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. त्याअंतर्गत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, नवीन रेल्वे लाईन टाकणे, 100 टक्के विद्युतीकरण आणि प्रवासी आणि मालमत्तेची सुरक्षा वाढवणे यासारख्या विस्तृत उपक्रमांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करणार आहेत. देशभरातील 508 स्थानकांचे एकाच वेळी नूतनीकरण करण्याच्या या योजनेचा आज शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी यांच्या मते, हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, जे लाखो लोकांसाठी वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे, देशातील हजारो शहरे रेल्वे द्वारे जोडली आहेत.
पंतप्रधान भारतभर ‘अमृत भारत स्टेशन योजने’चे उद्घाटन करतील आणि 508 स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांचा शुभारंभ करतील, त्यापैकी 71 रेल्वे स्थानके उत्तर रेल्वे झोनमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे दिल्ली कॅंट, दिल्ली सब्जी मंडी आणि नरेला येथे कार्यक्रम आयोजित करणार आहे.
योजनेचा उद्देश
- शहराच्या दोन टोकांचे एकत्रीकरण
- स्टेशन इमारतींची सुधारणा आणि पुनर्विकास
- आधुनिक प्रवासी सुविधांची तरतूद
- उत्तम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे
- या प्रकल्पासाठी 24470 कोटी रुपये खर्च येणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पुनर्विकास प्रकल्पाची किंमत 24,470 कोटी रुपये असेल आणि यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
पंतप्रधान ज्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 55, बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओडिशातील 25 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पंजाब, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 22, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 18, हरियाणामध्ये 15 आणि कर्नाटकमध्ये 13 आहेत.





