साप्ताहिक राशिभविष्य (दि. ६ ऑगस्ट २०२३ ते १२ ऑगस्ट २०२३)

155

मेष : स्पर्धात्मक पातळीवर यश

सप्ताह होतकरू तरुणांना अतिशय आश्वासक आणि भाग्यसूचक राहील. ता. ६ ते ९ हे दिवस सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देणारेच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटी, वैयक्तिक उत्सव-समारंभ, विशिष्ट करारमदार आणि सहकुटुंब मौजमजा इत्यादीतून हे दिवस छानच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार पुत्रोत्कर्षाचा.

वृषभ : परदेशी तरुणांना चांगला कालखंड

सप्ताहारंभ उत्तम प्रवासयोगाचा. बुध-गुरूचा शुभयोग. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय ठरेल. ता. ७ ते ९ हे दिवस शुभग्रहांच्या जबरदस्त कनेक्टिव्हिटीचे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींबाबत बँकेचं कर्ज मंजूर होऊ शकेल. नोकरीच्या मुलाखती. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. कलाकारांचा भाग्योदय, नोकरीत मानांकन.

मिथुन : झगमगता अध्याय सुरू होईल

पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री शुक्रभ्रमणाचा एक झगमगाटी अध्याय सुरू होईल. विशिष्ट ध्येय साकारेल. नवपरिणितांचा भाग्योदय. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ८ ची अष्टमी मोठी भाग्यसूचक. मोठी सरकारी कामं होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या मौजमजेचा.

कर्क : कलाकारांचा भाग्योदय

सप्ताहातील ग्रहमान मोठी मजेदार फळं देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. सप्ताहारंभ उत्तम गाठीभेटींचा. कलाकारांचा भाग्योदय. काहींचं परदेशगमन होऊ शकेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक प्राप्तीचा. ता. ८ व ९ हे दिवस खेळाडूंना भव्य यश देतील. ‘पुनर्वसू’च्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल.

सिंह : व्यावसायिक प्रदर्शनातून लाभ

तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचं एक उत्तम फिल्ड राहील. शिवाय, शुक्र-हर्षल योगातून काहींना अपवादात्मक परिस्थितीतून लाभच होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ९ हे दिवस उत्तम साथसंगतीचे. काहींना राजकीय लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक प्रदर्शनातून लाभ. कलाकारांचे सुंदर कार्यक्रम होतील.

कन्या : धनाची चिंता जाईल

सप्ताहातील बुध-गुरूचा शुभयोग सामाजिक क्षेत्रातील मंडळींना वलयांकित करणारा. काहींची उत्तम तीर्थाटनं होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडींतून अपवादात्मक असे लाभ होतील. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. चित्रा नक्षत्राचा डामडौल वाढेलच. प्रेमिकांच्या गुप्त गुजगोष्टी होतील!

तूळ :  नोकरीत बढती मिळेल

सप्ताहारंभ एकूणच शुभ्रग्रहांचा. बुध-गुरू शुभयोग आणि शुक्र-हर्षल योगाची रोषणाई तरुणांसाठी धमाल ठरणार आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळून येतील! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती वैभवसंपन्न होतील. ता. ७ व ८ हे दिवस जीवनात रंगत आणतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना लॉटरी शक्य. विशाखा नक्षत्रास नोकरीत अनपेक्षित बढती मिळेल!

वृश्‍चिक : कर्जमुक्तीचा आनंद मिळेल

सप्ताह नोकरी – व्यवसायात प्रगती करणाराच. राजकीय गॉडफादर भेटेल. व्यावसायिक कर्जमुक्तीचा आनंद मिळेल. ता. ९ ते ११ हे दिवस चमत्कार घडवतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट नैतिक विजय मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या तरुणांना उत्तम विवाहस्थळं येतील. नोकरीत मानांकन.

धनू :  सतत चर्चेत राहाल

बुध-गुरू शुभयोगाचं फिल्ड पूर्णपणे साथ देईल. सप्ताहारंभ मोठा भाग्यसूचक राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती मोठं फोटोफिनिश यश संपादन करतील, अर्थातच सतत चर्चेत राहतील. परदेशस्थ तरुणांचे व्हिसाचे प्रश्न सुटतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन संपन्नतेकडे वाटचाल करेल.

मकर : जुन्या गुंतवणुकीतून लाभ

सप्ताहात व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं गाजतील. ता. ७ ते ९ हे दिवस झगमगाटी राहतील. श्रवण नक्षत्रास जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. धनिष्ठा नक्षत्रास नोकरीत परिस्थितिजन्य लाभ होतील. तरुणांचे प्रेमविवाह यशस्वी होतील. उत्तराषाढा व्यक्तींची आरोग्यचिंता जाईल. दैवी प्रचिती येईल.

कुंभ :  व्यावसायिकांना मोठे लाभ

सप्ताहारंभ शुभग्रहांच्या साथसंगतीचाच. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. तरुणांना बुध-गुरू शुभयोगाचं पॅकेज पूर्णपणे लाभ देईल; मात्र प्रेम प्रकरण सांभाळा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार लॉटरीचा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्राकडून लाभ.

मीन : सरकारी कामात यश

शुभग्रहांचं उत्तम फिल्ड राहील. घरात मंगलकार्यं ठरवतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री शुक्रभ्रमणाचा पूर्ण लाभ होईल. उत्तम सहकार्य लाभेल. ता. ८ ते १० हे दिवस उत्तम साथसंगतीचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामातून यश. पती व पत्नीला उत्तम नोकरी मिळेल. नोकरीत वरिष्ठांची कृपा होईल. बदलीचं संकट टळेल.