हळवल तिठ्यावर लक्झरी बस पलटी , 2 जण ठार

कणकवली : अपघाताला आमंत्रण देणाऱ्या हळवल तिठ्यावर आज पहाटे अपघात झाला . कणकवली शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या या अवघड वळणावर आज गुरुवारी पहाटे 5.30 वा च्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी खाजगी आराम बस पलटी झाली .या अपघातात बसमधील 2 प्रवासी गंभीर जखमी झाले होते त्यांचा मृत्यू झाला आहे .

यामध्ये 1 पुरुष तर 1 महिला प्रवासी आहे .तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत . सुमारे 40 प्रवासी या गाडीतून प्रवास करत असल्याचे समजते. हळवल फाट्यावरील अवघड वळणावर ही लक्झरी पलटी झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कर्मचारी किरण मेथे, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी घेतली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे अस्थिभंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे धोकादायक वळण वारंवार अपघातास निमंत्रण देत असून महामार्ग चौपदरीकरण कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कामामुळे या अपघातग्रस्त वळणावर सातत्याने गेले काही वर्षे अपघात सुरू आहेत.

एवढे अपघात होऊन देखील संबंधितांचे डोळे केव्हा उघडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी कणकवली नगर पंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांच्याशी संपर्क साधत कलंडलेली लक्झरी उभी करण्याकरिता जेसीबी पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार ठेकेदार अनिल पवार, जावेद शेख हे जेसीबी घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने ही लक्झरी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.