बांदा : बांदा दाणोली जिल्हामार्गावरील विलवडे वाफोली रस्त्याची अतिवृष्टी मुळे दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मुळेच जीवघेणे खड्डे पडले असून ते त्वरित भरावेत. आठ दिवसांत संबधीत विभागाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे सरपंच प्रकाश दळवी व वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी दिला आहे.
बांदा दाणोली जिल्हामार्गावर विलवडे व वाफोली अतिवृष्टीमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली. विलवडे जांभळी बस स्टाँप समोर मोरी खचने, टेंबवाडी सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे, काही महिन्यापुर्वी धरणा नजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलामोठा खड्डा, तर वाफोली सोसायटी नजीक रस्त्याची चाळण झाली आहे. डोंगरीकर हाँटेल समोर जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून बरेच अपघात निमंत्रण देत आहे.
बांदा दाणोली मार्गा हा गोव्यात जाण्यासाठी आंबोली वर्षा पर्यटनासाठी जवळचा मार्ग आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला मोठ मोठे खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मोठी हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे.





