गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक ; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? : रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती.

151

जयपूर : जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये आज पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेत एका सहाय्यक पोलीस निरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका आरपीएफच्या जवानानं हा गोळीबार केला आहे. पण या गाडीत नेमकं काय घडलं? आणि याबाबतची अधिकची माहिती काय आहे? याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

ठाकूर म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार संपूर्ण माहिती अद्याप कळू शकलेली नाही. यामध्ये एक एएसआय आणि तीन प्रवाशांना गोळी लागली आहे. या चारही जणांचे मृतदेह बोरिवली इथं पोस्टमॉर्टमसाठी उतरण्यात आल्या आहेत. याचा अहवाल आल्यानंतरच त्यांची मेडिकल स्थिती काय आहे? ही माहिती दिली जाईल.

आरोपीनं केली चेन पुलिंग
हा गोळीबार करणारा कॉन्स्टेबल ट्रेनची ‘चेन पुलिंग’ करुन दहिसरमध्ये उतरला. त्याला आरपीएफच्या पोलिसांनी पकडलं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे, याचा पुढील तपास केला जात आहे. तो मानसिक तणावाखाली होता की नाही, याची चौकशी सुरु आहे.

त्यानंतर विस्तृत माहिती मिळाल्यानंतरच हे कळू शकेल. ही दुर्घटना सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. ज्या प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे त्याची चौकशी करण्यात येईल तसेच त्यांच्या नातेवाईकांना कळवलं जाईल. आम्ही सध्या हॉस्पिटलमधून रिपोर्ट घेत आहोत. त्यानंतर त्यांची नावं आणि ओळख पटू शकेल, असंही ठाकूर यांनी सांगितलं.