मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालये आणि दंत महाविद्यालयांत एकूण 13 हजार 391 पदे रिक्त आहेत. आयुर्वेद महाविद्यालयांतील रिक्त पदांची संख्या 876 इतकी आहे. यातील गट अ आणि ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
तसेच विभागाच्या अखत्यारीतील सर्व पदे भरली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रिक्त पदांबाबत विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. विभागातील गट अ व ब ची पदे भरताना डॉक्टरांची कमतरता असते. ही पदे भरण्यासाठी डॉक्टरांना चांगला पगार, अधिकच्या सुविधा देण्याची आवश्यकता मंत्री मुश्रीफ यांनी बोलून दाखविली. त्यामानाने गट क व ड ची पदांसाठी उमेदवार मिळण्यात अडचण नसते असेही ते म्हणाले.




