सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या ६८ व्या वाढदिवस सप्ताहानिमित्त मतदार संघात आयोजित केलेले कार्यक्रम अतिवृष्टी व रायगड खानापूर येथील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर तुर्तास स्थगित करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती केसरकर मित्रमंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, अतिवृष्टी व रायगड खानापूर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले काही उपक्रम तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. मात्र शनिवार दिनांक २२ जुलैला सकाळी १०.०० वा प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे होणारा व २३ जुलैला सकाळी १० वा. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे होणारा मेगा आर्थोपेडीक कॅम्प नियोजनानुसार होणार आहे. तसेच यशराज हॉस्पिटल सावंतवाडी यांच्या सहकार्याने २३ जुलैला होणारा महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान व मार्गदर्शन विशेष शिबीर यशराज हॉस्पिटल, सावंतवाडी येथे होणार आहे. वरील लोकसेवेचे तीन आरोग्य कॅम्प वगळता मतदार संघातील सर्व कार्यक्रम स्थगित करण आले आहेत. यामध्ये दोडामार्ग येथील मॅरेथॉन स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ व वेंगुर्ले येथील राज्यस्तरीय पावसाळी हॉलीबॉल स्पर्धा इत्यादी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. तरी मतदार संघातील सर्व नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केसरकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.





