“सीएम आलेत म्हणून तीन तास वाया..! “; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झाडलं..!

121

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी गावात मुसळधार पावसानंतर दरड कोसळली. यामध्ये संपूर्ण वाडी ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सकाळपासून प्रशासन बचावकार्य करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून नियंत्रण कक्षात बसून घटनेवर लक्ष ठेवून होते.

अजित पवार सकाळी मंत्रालयात लवकर आले. यावेळी त्यांनी थेट नियंत्रण कक्ष गाठले. इर्शाळवाडी येथे उपस्थित अधिकार आणि नेत्यांशी ते सतत संपर्क करत होते. यावेळी अजित पवार यांनी तेथील अधिकाऱ्यांना सुनावल्याची माहिती मिळत आहेत. तसा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
एनडीआरएफचे चार पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सकाळी घटनास्थळी पोहोचले होते. अजित पवार प्रांत अधिकाऱ्यांसबोत फोनवर बोलत होते. यावेळी ते तेथील मदतकार्याची माहिती घेत होते. जखमी आणि मृतांची संख्या अजित पवार लिहून घेत होते.

नंतर अजित पवार गिरीश महाजन यांच्याशी बोलत होते. तेथील परिस्थिती जाणून घेत होते. ज्यावेळी अधिकारी मुख्यमंत्री आले म्हणून खाली उतरत आहे, असे अजित पवारांना कळले, तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.