महानिर्देशक राकेश पाल ; भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे प्रमुख..!

37

नवी दिल्ली : महानिर्देशक राकेश पाल, पीटीएम, टीएम यांची भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महानिर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी असून जानेवारी 1989 मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. त्यांनी इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, कोची येथे तोफखाना आणि शस्त्र प्रणालीमध्ये विशेष प्रशिक्षण प्राप्त केले आहे आणि इंग्लंडमधून इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्स केला आहे. या अधिकाऱ्यास भारतीय तटरक्षक दलाचा पहिले गनर म्हणून मान्यता आहे.

चौतीस वर्षांच्या आपल्या अविचल आणि प्रतिष्ठित कारकिर्दीत, ध्वज अधिकाऱ्याने अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या समुद्रावर आणि बेसवर केल्या आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे गांधीनगर येथील तटरक्षक उत्तर-पश्चिम क्षेत्र मुख्यालयाचे कमांडर, नवी दिल्ली येथे तटरक्षक मुख्यालयात नीती व योजना विभागाचे उपमहानिर्देशक आणि अतिरिक्त महानिर्देशक तटरक्षक. याशिवाय, त्यांनी तटरक्षक मुख्यालयात विविध प्रतिष्ठित जबाबदर्‍या जसे इन्फ्रा व वर्क्स विभागाचे निर्देशक आणि प्रशासन विभागाचे प्रधान निर्देशक पार पाडल्या आहेत. त्यांच्याकडे समुद्रातील कार्याचा प्रचंड अनुभव आहे आणि त्यांनी भारतीय तटरक्षक जहाज समर्थ, भारतीय तटरक्षक जहाज विजेता, भारतीय तटरक्षक जहाज सुचेता कृपलानी, भारतीय तटरक्षक जहाज अहल्याबाई आणि भारतीय तटरक्षक जहाज सी-03 अशा सर्व श्रेणीच्या तटरक्षक जहाजांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी गुजरातमधील ओखा आणि वाडीनार या फॉरवर्ड एरियाच्या दोन तटरक्षक तळांचे देखील नेतृत्व केले आहे.

त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अतिरिक्त महानिर्देशक पदावर पदोन्नत करून नवी दिल्ली येथे तटरक्षक मुख्यालयात नियुक्त करण्यात आले. फेब्रुवारी 2023 पासून त्यांना महासंचालक तटरक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. त्यांच्या देखरेखीखाली अनेक मोठ्या कार्यवाह्या आणि उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले ज्यात प्रामुख्याने ड्रग्ज-अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करणे, अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या वेळी नाविकांची सुटका करणे, विदेशी तटरक्षक दलांबरोबर संयुक्त कार्यवाह्या, सागरी आपत्ती व चक्रीवादळादरम्यान मानवी सहाय्य, अवैध सागरी शिकरींविरुद्ध मोहिमा आणि सागरी सुरक्षा मोहिमा यांचा समावेश आहे.

त्यांच्या अनन्यसाधारण सेवेबद्दल त्यांना वर्ष 2013 मध्ये तटरक्षक पदक (टीएम) आणि वर्ष 2018 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
हे अधिकारी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते एक उत्कट संगीत प्रेमी आणि एक उत्साही खेडाडू देखील आहेत. ते श्रीमती दीपा पाल यांच्याशी विवाहबद्ध असून त्यांना कु. स्नेहल आणि कु. तरुषी या दोन मुली आहेत.

या अधिकार्‍यांस रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या विकास कामांबद्दल सविस्तर माहिती असून रत्नागिरी हे तटरक्षक दलाचे मोठे बेस बनविण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते नुकतेच 09 मे 2023 रोजी रत्नागिरी दौर्‍यावर आले होते.