रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली, मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. परंतु आज राष्ट्रवादीच्या तब्बल २१ पदाधिकाऱ्यांना शरद पवार गटाने घरचा रस्ता दाखविला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. राष्ट्रवादीने पक्षातून निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचे जिल्ह्याध्यक्ष बाबाजी जाधव, वसई-विरार जिल्ह्याध्यक्ष राजाराम मुळीक, तसेच पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत कृष्णाराव शितळे, राहुल हनुमंत भोसले, जगदीश शंकर शेट्टी, तसेच लोकसभा दिंडोरीचे रविंद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादीच्या २१ पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे.





