देवगड : ऑनलाईन ड्रेस मागवताना जामसंडे येथील एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील जामसंडे येथे विष्णुनगर येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आज्ञा अमेय गुमास्ते यांची ३२ हजार १३५ रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत झाला. याप्रकरणी आज्ञा गुमास्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामसंडे विष्णूनगर येथील आज्ञा गुमास्ते यांनी ४ जुलै रोजी एका साईट वरून ऑनलाईन ड्रेस मागविला होता. मात्र १२ जुलै रोजी आलेल्या पार्सल मध्ये ड्रेस ऐवजी फॉल लावलेली साडी व चिंध्या आल्या त्यांना पसंत नसल्याने ते परत पार्सल पाठविले व कॅश ऑनलाईन डिलिव्हरीने दिलेले ७९९ रुपये रिफंड करण्यासाठी एसएमएस केला. यावेळी एक फॉर्म भरण्यास सांगितले फॉर्म भरल्यानंतर ते पैसे रिफंड करण्यासाठी एसएमएस केल्यानंतर त्यांनी शनिवारी पैसे रिफंड झाले का याबाबत चेक केले .असता रिफंड न होता ३२१३५ रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून काढून घेतले व आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले .त्यांनी याबाबत देवगड पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा.द.वी कलम ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम व ६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत आहेत.





