पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जी 20 संदर्भात पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. जी 20 परिषदेच्या माध्यमातून देशातील महानगरांचा विकास अधिक वेगाने होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात देशाला प्रगतीपथावर नेल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले .

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी जी-20 अत्यंत महत्त्वाचा असून त्याद्वारे देशात उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केले. यामुळे भारताला पाचव्या क्रमांकाची वाढणारी अर्थव्यवस्था बनण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. गेल्या 8 वर्षांपासून देश गरिबीमुक्त आणि बेरोजगारीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाच्या तसेच प्रत्येक देशवासीयांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.





