कणकवली : गेले काही दिवस कणकवली तालुक्यातील वागदे येथे वास्तव्यास असलेला संशयित आरोपी प्रकाश विनायक पाटील (रा. गोवा) याला रिव्हॉल्व्हर, बंदुकीसह सोन्याचे दागिने व पैसे मोजण्याची मशीन व काही हत्यारे या मुद्देमालासह सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्या संशयितांला काल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेत कणकवली पोलिसांकडे अटकेच्या कारवाईसाठी ताब्यात दिले.त्याला दुपारी ३ वाजता कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संशयित आरोपी प्रकाश विनायक पाटील (रा. गोवा) हा अवैध शस्त्रसाठा आणि सोने चांदी चे दागिने रोकड असल्याची टीप सिंधुदुर्ग एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने १२ जुलै रोजी वागदे येथे छापा मारून आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रोख लाखोंची रक्कम, गावठी पिस्तुल, सिंगल बॅरेल बंदूक, तलवारी, १५ तोळे सोने, साडेचार किलो चांदी तसेच सोने चांदी वितळवण्याची मशीन सापडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे,आरोपी सांगली,सातारा, कोल्हापूर सह अन्य राज्यांमध्ये सराईत असल्याचे समजते.





