कुडाळ : पणदूर – अणावं सुकळवाड रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झाला आहे. संबंधित कार्यालयात वारंवार तोंडी सूचना करूनही रस्ता आजतागायत सुस्थितीत झालेला नाही. या रस्त्यावर बीबीएम व प्रिमिक्स कार्पेट करण्यात आला नाही. संबंधित प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षा बाबत अणाव सरपंच लीलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन कुलकर्णी, नंदकिशोर पारकर, सुवर्णा परब, श्रद्धा दळवी, महिमा जीकमडे, श्याम अणावकर, तसेच गावातील ग्रामस्थ प्रजासत्ताक दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर धरणे आंदोलन धरणार आहेत. मात्र, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाकडे राहील असे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडे देण्यात आले आहे.





