कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत आ. नितेश राणेंनी उचलले महत्वाचे पाऊल.!

36

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात बारा जणांचा नॉनमेडिकल स्टाफ ११ जुलै पासून रुग्णसेवेत…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कणकवली तालुक्यातील कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे अनेक प्रश्नाच्या विळख्यात राहिले होते. असे असताना याबाबतची माहिती घेत आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती व तेथील परिस्थिती पडताळली होती. उपजिल्हा रुग्णातील स्टाफ आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करून पुढील पंधरा दिवसांत आवश्यक असलेला स्टाफ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून येथील रुग्णसेवा सुस्थितीत करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र रुग्णांना येथून बाहेर रेफर करू नका असे ठणकावले होते. दिलेले आश्वासन हे पूर्णत्वास नेऊन आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पर्यायी स्टाफ उपलब्ध केला, असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधिमंडळात आवाज उठवला तर मंत्री कोकणात कोण काम करायला तयार नसल्याचे सांगत होते. टीका करणे सोप आहे,या अगोदर सरकार कडून अपेक्षा केली पण काहीच मिळाले नाही.मात्र,राजकीय इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो. माझ्या बैठकीत नेमकी किती लोक पाहिजे, विचारल्यावर १३ लोकांची मागणी होती. मी एक पाऊल उचललं आहे, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांची माणसे ग्रामीण भागात हॉस्पिटल मध्ये येऊन काम करतात. संस्था त्यांना मदत करते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ४ कनिष्ठ लिपिक आणि वर्ग ४ ची ८ कर्मचारी येत आहेत. याबाबत सिव्हील सर्जन यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच ११ जुलै पासून बारा जणांचा स्टाफ रुग्णसेवेत हजर होईल, अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. बारा जणांच्या स्टाफमुळे नॉन मेडिकल स्टाफची समस्या संपली असून त्याचा परिणाम रुग्णसेवा चांगली देण्यात होईल असे आमदार नितेश राणे म्हणाले.

यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक साधनसामुग्री राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध करून देणार आहे. १६ लाख रुपयांची सी आर्म मशीन जिल्हा नियोजन मधून देणार आहोत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवा का मिळत नाही ? याबाबत बैठक घेतली तेव्हा स्टाफ ची कमतरता असल्याचे जाणवले. त्यामुळे रुग्णसेवेत उणीव जाणवत होती. आरोग्य यंत्रणेकडे अपुरा स्टाफ ही सिंधुदुर्गातील अवस्था आहे. राज्य सरकार आमचे आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्याच गोष्टी साध्य करता येतात. जनतेला सुविधा देण्यासाठी नकार देता नये हे केंद्रीयमंत्री राणेंचे संस्कार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १३ जणांचा स्टाफ कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अत्यावश्यक असल्याचे मला जाणवले होते. ही गरज पूर्ण करण्यासाठी मी मुंबईतील एनजीओ शी बोललो आहे. हा सर्व स्टाफ ११ जुलै पासून हजर होणार असून त्यांचा पगारही एनजीओच्या द्वारे दिला जाणार आहे. शासनाकडून कर्मचारी भरती होण्याची वाट न बघता माझ्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आधारवड असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चांगली रुग्णसेवा देण्यासाठी मी बांधील आहे असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

फोटो ;

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आ. नितेश राणे, सोबत माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, आण्णा कोदे, डॉ. धर्माधिकारी आदी. ( छाया : मयुर ठाकूर )