देवगड : देवगड किल्ला येथे सुरू असलेल्या एसटी बसफेऱ्या अचानक बंद करण्यात आल्याने देवगड किल्ला येथील लोकांची गैरसोय होत आहे. यासाठी देवगड किल्ला येथील ग्रामस्थांनी आज देवगड एसटी आगारप्रमुख निलेश लाड यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देवगड किल्ला येथे एसटीच्या काही बस सुरू होत्या. मात्र त्या बस अचानक बंद करण्यात आल्याने यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी भेट घेऊन गैरसोयीबद्दल विचारणा केली होती. यापूर्वी ५ मे २०२२ रोजी प्रक्षम भेट घेऊन ग्रामस्थानी या संदर्भात अर्ज केला होता . त्यानंतर सकाळी कुंभवडे व कणकवली तसेच दुपारी कुंभवडे बोरवली ही गाडी सुरू करणे बाबत आपणाकडून आश्वासन दिलेले होते.
मात्र यावेळी रस्त्याच्या साईड पट्टीचे कारण करून किल्ला येथे येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडचण असल्याने सध्या स्थितीत बस सुरू करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले आहे. परंतु आता साईड पट्टीचे काम झालेले असतानाही गेले कित्येक दिवस चालू असलेल्या बस सुद्धा बंद करण्यात आले आहेत. तरी या निवेदनाद्वारे आपणास पुन्हा सूचित करतो की किल्ला येथे चालू असलेल्या एसटी बसेस या पंधरा दिवसात चालू न झाल्यास देवगड आगारातून एकही एसटी बाहेर जाऊ देणार नाही अशा आशयाचे निवेदन देवगड किल्ला येथील ग्रामस्थांनी देवगड आगार प्रमुख निलेश लाड यांना दिले आहे.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ मिताली सावंत ,सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम,महेश सागवेकर रोहित कदम आदी उपस्थित होते





