कुडाळ : कुडाळ येथील कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका स्वामिनी योगेश गावडे पूर्वाश्रमीच्या श्रीमती स्वामिनी उदय वारंग (वय – ३६, राहणार माणगाव) ह्यांचे गोवा येथील बांबोळी रूग्णालयात निधन झाले. पंधरा दिवसापूर्वी माणगाव येथील राहत्या घराशेजारी जागेत गेल्या असता त्यांना सर्पदंश झाला होता. यानंतर त्यांना माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून सावंतवाडीत दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने गोव्यातील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले पंधरा दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. सध्या त्या कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत होत्या. माणगाव हायस्कूल मध्ये रजा कालावधीत त्यांनी इंग्लिश विषयाचे अध्यापन केले होते. एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पती, दीड वर्षाची मुलगी, सासू, सासरे, दीर, आई-वडील, बहिण असा मोठा परिवार आहे. माणगाव मधील राजस्तरीय प्रसिद्ध व्हॉलीबॉलपटू योगेश गावडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या निधनानंतर माणगाव हायस्कूलमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.





