झोळंबेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा….

43

बांदा : प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले.

हरीपाठाने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानिमित्त झोळंबे ग्रामस्थांचे वारकरी भजन झाले. श्री विठ्ठलाची विधीवत पूजा झाल्यानंतर विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ वाजता ह. भ. प. जयानंद सावंत यांचे वारकरी कीर्तन झाले. दुपारी आरती, तीर्थप्रसाद कार्यक्रम झाला. दुपारी ३ वाजता खुटवळ गोवा येथील बाल किर्तनकार ह. भ. प. शारदा अर्जुन आरोंदेकर यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले.

रात्री ७ वाजता हरीपाठ झाला. त्यानंतर खुटवळ गोवा येथील प्रसिद्ध गायक विश्वास मेस्त्री आणि सहकारी यांचे सुश्राव्य भजन झाले. त्यानंतर विर्नोडे गोवा येथील विजय मालपेकर, विलास परब व संजय परब सहकारी यांचे भजन झाले. रात्री झोळंबे ग्रामस्थांचे भजन संपन्न झाले. द्वादशीला सकाळी ११ वाजता दिंडी नंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.