नवी दिल्ली : भारतामधील २१ अब्जाधीशांकडे देशातील ७० कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा अहवाल ऑक्सफॅम या संस्थेने दिला आहे. संपूर्ण जगात श्रीमंत आणि गरिब नागरिक यामधील अंतर वाढत जात असताना भारतासारख्या विकसनशील देशांमध्येही ही तफावत प्रकर्षाने दिसून येत आहे. Oxfam च्या अहवालानुसार, २०२० मध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पर्यंत अनेक भारतीयांना आपला रोजगारासंबंधी समस्या निर्माण झाल्या. काहींच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांनी आपली बचत गमावली. मात्र दुसऱ्य बाजूला भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. ही वाढ साधीसुधी नव्हे तर तब्बल १२१ टक्के एवढी आहे. कोरोना महामारीत भारतीय भांडवलदाराच्या संपत्तीमध्ये दिवसाला ३ हजार ६०८ कोटींची वाढ होत होती.
Oxfam च्या अहवालात असेही सांगण्यात येत आहे की, वर्ष २०२१ मध्ये भारताच्या फक्त पाच टक्के लोकांकडे देशातील एकूण ६२ टक्के लोकांची संपत्ती एकवटलेली आहे. तर दुसरीकडे भारताच्या ५० टक्के लोकसंख्येकडे देशातील फक्त तीन टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. ‘Survival of the Richest: The India Story’ या नावाने ऑक्सफॅमचा अहवाल प्रकाशित झाला आहे.





