सिंधुदुर्ग : सहकाराची ताकद काय आहे. सहकारातून आपण काय करू शकतो, याची जाण मला आहे. त्यामुळे सहकाराची चळवळ येणाऱ्या काळात कोकणात वाढली पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला चालना कशी मिळेल यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी आ. नितेश नारायण राणे, दिलीप दिघे व्यवस्थापक, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा सह. बँक संचालक, जयंत पाटील रायगड जिल्हा बँक अध्यक्ष, मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, अतुल काळसेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष, अजित गोगटे माजी आमदार, राजन तेली भाजपा जिल्हाध्यक्ष, कृष्णनाथ तांडेल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, आर. टी. मर्गज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष यांसह बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते बँकेच्या खातेधारकांसाठी घरपोच सेवा देण्यासाठी ‘मायक्रो एटीएम डोअर स्टेप बॅंकिंग’ सुविधेसह बँकेचे नव्याने अद्ययावत मोबाईल अँप आणि सोशल मीडिया सेल व प्रचारतंत्र चॅटबोट या सुविधांचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, आजचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण सर्व कोकण सहकारी बँकांचे अध्यक्ष एकत्रित आले आहेत. मी कल्पक कार्यकर्ता असल्याने प्रत्येक गोष्टीत व्यापकता शोधत असतो. महाराष्ट्राला वैभवशाली अशी सहकाराची परंपरा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास जो मोठ्या प्रमाणावर झाला तो सहकाराच्या माध्यमातून झाला. पश्चिम महाराष्ट्रात कारखानदारी, सूत गिरण्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या. तिथल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम तेथील सहकारी बँका, जिल्हा बँका, राज्य सहकारी बँकांनी केले आणि त्या पद्धतीचा विकास त्या-त्या विभागात, त्या-त्या प्रमाणात झाला. नंतरच्या काळात तेथील पुढऱ्यांनी तो सहकार स्वाहकार करून स्वतःसाठी वापरला. जिथे चांगले काम झाले तिथे चांगल्या जिल्हा बँक टिकल्या व ज्यांनी आपल्या बगलबच्चाना कर्ज वाटली त्या बँका, संस्था रसातळाला गेल्याचे पाहतोय. त्याचा दुष्परिणाम तेथील आर्थिक व्यवस्थेवर सहकाराच्या माध्यमातून झाल्याचे महाराष्ट्र गेले अनेक वर्ष बघत असल्याचे दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यानी एकत्रितपणे जर ठरवले तर कोकणच्या विकासाला सरकारपेक्षा जास्त गती देण्याचे काम होईल. कारण सहकारात काय ताकद आहे हे मी जवळून पाहतोय. महाराष्ट्रात मी मुंबई जिल्हा बँकेचे नेतृत्व करत असताना शेतीविषयक कर्ज देण्यास आम्हाला संधी नसते, कुठेतरी छोट्या मच्छिमार संस्था असतात तेवढ्यापूरता आमचा तो विषय कर्जासंबंधी राहतो. त्यामुळे आमचा असणारा पैसा आम्ही ग्रामीण भागात साखर कारखान्यांना देण्याचे काम करतो. सूत गिरण्या, काही मोठ्या शिक्षण संस्थांना देण्याचे काम करतो आणि मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून तेथील संस्थांना देऊन तिथल्या विकासाला योगदान देण्याचे काम करतो.
मी मुंबई बँकेचा झालो त्यावेळी महाडला माझा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी मी तरुणांनी पुढे यावे, मी प्रकल्पासाठी पैसे देतो असे आव्हान केले होते. पण अजूनपर्यंत कुणी पुढे आलेले नाही. ही मानसिकता बदलायला हवी. सुदैवाने आज आमचे सरकार आहे. मुंबई बँकेपासून सिंधुदुर्गपर्यंत २०-२५ हजार कोटींचा व्यवसाय आपण करतोय. या २०-२५ कोटीच्या माध्यमातून आपण कोकणचा विकास करू शकतो. त्या दृष्टीने येणाऱ्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, आपल्या पाचही बँका अ वर्गात आहेत. त्यामुळे आपण अत्यंत उत्तम बँका चालवतोय. विदर्भ, मराठवाड्यातील बँका आज डबघाईला आल्या आहेत. सहकाराचा मूळ उद्देश सभासदांच्या आयुष्यात काहीतरी निर्माण व्हावे, सहकाराच्या माध्यमातून उद्धार व्हावा, प्रगती व्हावी ही भुमिका होती. परंतु विदर्भ, मराठवाड्यातील बँकांचे पुढारी, अध्यक्ष होते त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी बँकांचा वापर केला. सर्वसामान्यांच्या पैशांचे वाटोळे केले. सरकारने या बँकांना मदतही केली. पण त्या पुन्हा काही उभ्या राहिल्या नाहीत.
*सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून*
*मुंबईत १६ इमारती उभ्या केल्या*
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबईत बिल्डर कशाला पाहिजे. बिल्डरकडे पैसे असतात म्हणूनच तो लागतोना. मग ज्या गृहनिर्माण संस्थांची नोंदणी असेल, आपल्या बँकेची सदस्य असेल तर पैसे आम्ही देतो बिल्डर कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट नेमतो आणि ती इमारत उभी करतो. आज मुंबईत १६ इमारती सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही उभ्या केल्या आहेत. १६०० प्रकरणं आमच्याकडे आली आहेत. सेल्फ डेव्हलपमेंटला पैसा उभा करून दिला. सर्वसामान्य मराठी माणसाला ४०० स्क्वे.फुटाचे ५०० स्क्वे.फूट बिल्डर घर देवू शकत नव्हता. आपण ८०० स्क्वे.फुटाचे घर दिले. ही सहकाराची ताकद आहे.





