जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ पोलिसांच्या वाहनावर अचानक झाड कोसळले. या अपघातात सहायक पोलीस निरीक्षकासह `चालकाचा मृत्यू झाला आहे तर ३ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा. अंबड, (नाशिक) व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. चाळीसगाव तालुक्यातील हे पोलिस पथक गुरुवारी पिलखोड येथील एका गुन्ह्याच्या तपासासाठी जात असतांना त्यांच्या गाडीवर झाड कोसळले.
अपघातात मृत्यू झालेले सुदर्शन दातीर हे नाशिक शहरातील अंबड येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच रात्री त्यांचे नातेवाईक वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख तयार दातीर यांची होती.
या अपघातात चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असतांना हा अपघात झाला. एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.





