सिंधुदुर्गातील ४२००० पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसानभरपाई वितरित होण्यास सुरुवात !
पीकविमा नुकसानभरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा !
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील जवळपास ४२००० पात्र शेतकऱ्यांना जवळपास रक्कम रु.९० कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये ८६०००/- तर काजू पिकासाठी अधिकतम प्रती हेक्टरी रुपये ५७६००/- एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात यातील १५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई वितरित कारणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.



