कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आयोजित शैक्षणिक मदत उपक्रम संपन्न

15

 

मुंबई (सुजित कदम)

कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आयोजित शैक्षणिक मदत उपक्रम संपन्न

कोकण कट्टा सेवाभावी संस्था व श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र, आपटे फाटा स्वामी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासाच्या शुभारंभानिमित्त रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद व आश्रम शाळांमधील सुमारे ८५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

 

या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर व खाऊ देण्यात आला. दुर्गम भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवावा, या हेतूने हा उपक्रम गेली अनेक वर्ष सातत्याने राबवण्यात येतो आहे, असे कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजितदादा पितळे यांनी सांगितले.

 

कार्यक्रमात तारा विभागातील समाजसेविका पुष्पलता पाटील यांनी, “विभागातील अनेक मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत, त्यामुळे हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. भविष्यातही अशीच मदत मिळावी,” असे नम्र आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी स्वामी मठातर्फे सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना गोड प्रसाद व जेवण देण्यात आले.या प्रसंगी प्राध्यापिका पुष्पा शिर्के, शिक्षक निलेश कोळी, मठाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्नाथ गावडे, राजमुद्रा मासिकाचे संपादक पत्रकार अरविंदजी गुरव, सुजित कदम, विवेक वैद्य व राजन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.